कापरा..... थरार पाथरा चा !!

वर्ष २००४- महिना जुलैचा, धो धो पावसात स्वप्नील आणि मी आम्ही दोघे रायलिंग पठारावर बसून (अर्थात चिंब भिजून) सुके आवळे चाखत होतो… समोर स्वच्छ सफेद रंगाचा ढगांचा पडदा तयार झाला होता. जणू त्या पडद्यात आम्ही आमचा सगळा मागील काळ चित्रफित करत होतो, अचानक वाऱ्याचा जोर खूप वाढला आणि समोरचा सफेद पडदा हलू लागला, ढग पळायला लागले आणि समोर हिरवागार लिंगाणा पाचूसारखा लखलखू लागला.
लिंगाणा बघून स्वप्नीलच्या तोंडून पटकन शब्द बाहेर पडले 'वाह असा दिमाख आणि अशी भयंकर चढाई सह्याद्री मध्ये कुठेहि नाही' आणि ते शब्द झेलत मीही चटकन बोलून गेलो 'आहे', दोन क्षण स्वप्नील माझ्याकडे बघतच राहिला...... पण माझी नजर सरळ लिंगाणा आणि पलीकडे रायगडावर खिळली होती. त्याने मला झोपेतून जाग कराव तसं जागवलं आणि विचारलं 'कुठे ???'… स्थिरावलेल्या नजरेने मी म्हणालो "पाथरा" !!!

पाथरा घाटाचा एक अवघड कातळटप्पा पार केल्यावर काढलेले एक छायाचित्रण
पाथरा ?? आणि तो कुठे आहे…स्वप्निल आश्चर्यभाव चेहऱ्यावर आणीत बोलला. मी म्हटले 'आजोबाच्या खांद्यावरून दक्षिणेला एक सरळसोट धार खाली उतरते, अतिशय अवघड-अनवट वाट. घाटाच्या वरून नुसते पाहिले तरी डोके चकरवते, कोणाचाही वावर नसलेली आणि अतिशय बिकट असलेली हि वाट सहसा कोणी करत नाही, पायथ्याला दोन गावं कुंदाची वाडी आणि बिथडवाडी पण ह्या दोनही वाडीतून पाथरा गाठणे म्हणजे अतिशय हाल सोसून वाट काढावी लागते. गावातले लोक विचारतील "कुठून चाललेत पावनं?" त्याचं उत्तर पाथरा दिलं कि त्यांचे हावभाव सगळं समीकरण समोर मांडतात'. असा आहे पाथरा.

देशावरून कोकण पहायची मज्जा काही औरच असते !!


स्वप्नील सगळं ऐकत होता समजत होता आणि काही वेगळी गणिते मांडत त्याने एक काठी उचलली, ओल्या लाल मातीत त्याने माळशेज पासून रतनगडापर्यंतचा एक विचित्र पण तरीही समजून येईल असा नकाशा आखला. आता स्वप्नील बोलत होता आणि मी बघत व ऐकत होतो, त्याने सुरवात पाथरा पासून केली 'बघ आजोबाच्या दक्षिणेकडून पाथरा चढू गुहिरी ने खाली उतरू गुहिरीवरून रतनला जायला कोणता मार्ग आहे का ?' मी म्हटले आहे कात्राची खिंड आणि रतनच्या मधून चिमणी क्लाइम्ब मारून आपण जाऊ शकतो, त्यावर तो खुश झाला 'व्वाह ! फारच छान, मग कात्राचा माथा गाठू. पण तिकडून खाली उतरायला?' मी बोललो कळंबधारचा मार्ग आहे पण खूप कठीण आहे, दोर लागेल.

घेऊ कि दोर माझे ६ मित्र, आम्ही सगळे १५० ते २०० फुटी दोर घेऊनच येऊ मग आपल्याला काहीही करता येईल, नाही जमला कळंबधारेचा मार्ग तर कात्रा उतरू त्यात काय.

कातर कडा, कात्रा
त्यात काय? हे बोलायला जेवढं सोपं वाटत होतं तेवढंच ते साकार करण कठीण होतं, कात्रा म्हणजे रतनच्या दक्षिणेला असलेला एक उंचच उंच डोंगर ज्याची उभी धार वारा आणि पाणी दोहोंनाही स्थिरावून देत नाही. घटोत्कच मांडी घालून बसावा असा कातर कडा म्हणजे कात्रा आणि  म्हणतो त्यात काय. पुढील वर्षात म्हणजेच २०११ मध्ये आम्ही हे दिव्य खरोखरच अनुभवले आणि तो चित्तथरारक अनुभव सांगताना पण रोमांच उभे राहतात, असो.

पिलान तर सगळा बनला होता पण आधी पाथराची पाहणी करायची होती, स्वप्नीलला बोललो पहिले जाऊन पहावा लागेल. तो बोलला उद्या आपण निघतोय पाथरासाठी… आणि एवढं बोलून आम्ही रायलिंगला रामराम ठोकला, त्याच्या जीपमध्ये माझ्या डोक्यात एकच विचार चालू होता…. पाथरा ह्या वेळेस करणे म्हणजे सह्याद्रीला एक प्रकारे दिलेलं आव्हान होतं.... त्यात गावाचं कोणी बरोबर येणं पण शक्य नव्हत कारण शेती करायची असल्यामुळे कुणी बाहेर पडत नाही. मला अशा वेळी एकच चेहरा समोर आला महादू आजोबा… एक जबरदस्त चपळ, कडवा आणि बिकट वाट अंधारातही अचूक काढणारा आमचा महादू आजोबा. बस्स त्यालाच बरोबर घ्यायचं ठरवलं.
पुण्याला स्वप्नीलच्या घरी आलो, लगोलग सगळं सामान घेतलं… त्याने बरोबर १५ फुटी दोर घेतला आणि बोलला 'अडी अडचणीत कामाला येईल'.
मी त्याला फक्त एवढंच बोललो 'पाऊस फार आहे आपण सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये गेलेलं चांगलं, आता आपल्याला काही फारसं दिसणारही नाही' त्यावर त्याने प्रतिउत्तर देत सांगितल 'नजारा कोणाला बघायचा आहे, आपण वाट शोधणार आणि लक्षात ठेवणार आहोत…चल माझी तयारी झाली'.

जुलैचा पाऊस म्हणजे अंगावर बाणांचा मारा आणि आम्ही सह्याद्रीमधली एक अतिबिकट वाट शोधायला जाणार होतो, सायंकाळी सुमारे ४.३० वाजता आम्ही जुन्नर गाठले…पावसाचा मारा कमी होता, माळशेजमध्ये गाडी वळली आणि देशावरून कोकणात पाऊल ठेवतो न ठेवतो तोच पावसाने आपले विक्राळ रूप दाखवले. टोकावडे सरळगाव शेणवा डोळखांब आणी गुंडे असा प्रवास होता, रात्रीचे ८.३० झाले आणि आम्ही गुंड्यात प्रवेश केला. पूर्ण गाव शांत निद्रिस्थ होतं, गाडी घराकडे वळवली आणि महादू आजोबांच घर गाठलं…. तेही विष्णूरूप घेऊन पहुडले होते पण आम्हाला बघून हूरहुरले आणि उठून खाटेवर बसले. ' ह्या वखताला इथ कुणीकडं आलातास' मी म्हटले 'आबा पाथरा गाठायचा विचार आहे'.


काय म्हणलास, पाथरा… डोकं ठिकाणावर हाय कि गहाण ठेवलयास. ह्या पावसात पाथरा माझ्या बा नं बी केला न्हाय आणि तुमी चाल्लाय व्हय पाथरा ला, जमायचं न्हाय पोरा.
आबा सकाळी निघायचं आहे, आणि तुमच्या शिवाय शक्य नाही. कसबस करून त्यांना तयार केलं, ते झालेही तयार पण एकाच अटीवर ती म्हणजे "वाट काशिबी असलं, पन माघार घेऊ नही"



आम्ही तिकडेच निद्रासन घेतले आणि पहाटेच्या ५ ला त्यांनी आम्हाला जाग केलं, कमरेला धोतर डोक्यावर घोंगडी, हातात बोरीची टणक काठी आणि धोतराला खोचलेला कोयता…जणू भैरोबा उभा आहे असा आभास झाला. ५.३० ला आम्ही गुंडे सोडले आणि जंगलवाट धरली जेणेकरून आमच्यावर पावसाचा मारा कमीत कमी व्हावा. आम्ही आज्या पर्वत गाठला आणि त्याची ३ टेकाडे चढून धारेवरून दक्षिणेला चालत होतो, वाट अतिबिकट तर होतीच पण झाडांच्या वेली आणि फांद्या आमची वाट अडवीत होत्या. कारवी फार माजली होती वरून वरुणदेव आमच्यावर बाणांचा मारा करत होते आणि महादू आजोबा त्यालाही हुलकावणी देत जंगलातून वाट काढत होते, एका धारेवरून दुसर्या धारेवर असं आमच चालूच होतं. वाट अशी असावी असा आम्ही दोघांनी अंदाज बांधलाच होता मध्ये दोन धबधबे लागले त्यांना व्यवस्थित पार करत आम्ही पाथराच्या ऐन खिंडीत पाय टेकला. तिकडे एक उभा २५-३० फुटी पाषाण झाडाला टेकून होता, त्याला बघून असं वाटत होतं कि जणू त्या झाडाचा त्याने आधार घेतला असावा आणि पुढे गेलो न गेलो तोच पाण्याचं एक टाक लागलं, बाजूला घाटन्देवीचं मंदिर वजा गडद होती. आम्ही तिकडे थोडा वेळ स्थिरावलो, पुढंच काहीही दिसत नव्हत आणि मागे बघितले कि कसे आलो तेही समजत नव्हत.

घाटनदेवी, फोटो © स्वप्नील ओंक
स्वप्नील कानात पुटपुटला 'तू काळजी करू नकोस मी प्रत्येक ठिकाणी खुणा करून ठेवल्या आहेत'

खिंडीत पाऊल टाकले आणि जणू घाटन्देवीने वरुणदेवांना आदेश दिला असावा कि पाऊस आता पुरे… पाऊस थांबला, ढगांचा पडलेला अजगर विळखा सुटू लागला आणि ते सर्व ढग वाऱ्याचा मार खात देशावर पळून जाताना दिसले… समोरचा परिसर स्वच्छ दिसू लागला, कुमशेताच्या कोंबड्या पासून पार भीमाशंकर पर्यंत सर्व परिसर अगदी नव्हे पण स्पष्ट अस्पष्ट दिसत होता. आंम्ही तिकडे बराच वेळ थांबलो, कोंबडा-न्हाप्ता त्याच्या खाली घोडीशेप-हरीशचा बालेकिल्ला-रोहिदास-देवदांड्या-भोजगिरि-घुण्या-भैरवगड-वानरलिंगी-ढाकोबा-भीमाशंकर असा अफाट परिसर डोळ्यासमोरून आजही जात नाही. त्याचंबरोबर समोर वर पाहिले कि डोके चक्रावून टाकणारा चढ दिसत होता पाथराचा, खरी कसब तर आता लागणार होती आमची, आमच्या धैर्याची आणि आमच्यातल्या गिर्यारोहकाची………



ओकांचं कार्ट माळशेजचे सर्व कडे आणि त्याचं वर्णन आबांना सांगण्यात गुंग होतं आणि मी पुढची ९०' अंश कोनाची ती कापरं भरवणारी चढाई बघण्यात. खरंच त्यावेळी मनात एक विचार आला कि हि घाटवाट काढणाऱ्याला दंडवत ठोकलं पाहिजे.
खिंड गाठेपर्यंत आमची चांगलीच पायपीट झाली होती, स्वप्नीलने इथेच घोषणा केली कि पावसाळ्याचा अंदाज घेत हा घाट पावसाळ्यात सह्याद्री मधला सर्वात कठीण आणि कपटी घाट असावा… त्याच्या तोंडचं वाक्य 'हा घाट नाही घात आहे' त्यावर आबा म्हणाले 'अरे हि तर सुरवात आहे'.
चढाईच्या पूर्वी एक छोटं झाड लागतं तिकडे आम्ही आमच्याकडची सफरचंद फस्त केली आणि पुढे चालू लागलो, आता वाट 'दगडांच्या देशाची' होती जे पावसामुळे ओले चिंब झाले होते. इथून पुढे ओकांनी नेतृत्व सांभाळलं… ओक 'क्लाईम्बर' मध्ये NIM मधून ५ सुवर्ण पदक मिळवणारे गिर्यारोहक होते आणि आमचा भरोसा त्यांच्यावर जास्त होता आणि आजही आहे, त्याने क्षणात आणि अगदी सहजपणे चढाई सुरु केली. दोन तीन छोटे कातळटप्पे पार केले आणि एका अवघड कातळटप्प्याला येउन भिडलो…. कडा १० फुटी किव्वा जास्तीत जास्त १५ फुटी असावा पण ओल्या दगडावर आमचे पाय टिकत नव्हते, स्वप्नील वर चढून आम्हाला मार्गदर्शन करत होता.... मी पायातले फ्लोटर्स काढून त्याच्या जवळ दिले.
अतिशय सावध, शांत आणि धैर्याने तो टप्पा पार झाला, पुढचा मार्गहि आम्ही असाच गाठला आणि घाट संपायची लक्षणं दिसू लागली…खूप बरं वाटत होतं आणि आनंदही, कि आपण एवढा कठीण घाट चढलो पण तो आनंद जास्त वेळ तग धरू शकला नाही. कारण शेवटच्या टप्प्यात एका दगडाला वळसा घालून जिकडे मार्ग जात होता.... तिकडे मध्ये एक मोठा धबधबा वाहत होता आणि तिथला दगड त्या पाण्याच्या प्रवाहामुळे उतरंडीला खोल खोल जाताना दिसत होता. पलीकडच काहीच दिसत नव्हत, स्वप्नीलने अतिशय धाडसाने आणि सर्व कौशल्य पणाला लावून तो धबधबा पार केला..... पण प्रश्न आमचा होता.त्याने पलीकडे जाऊन आम्हाला हाक देत खालील शब्द उद्गारले जे आजही कानात घुमतात, ज्या ज्या वेळी मी पाथरा घाट चढतो…. ते शब्द होते...
"तिकडेच थांबा, एक पाऊलहि पुढे येऊ नका…. दगड घसरा आहे आणि तोल गेला तर खेळ कायमचा संपला"

तो काय करत होता? कुठे जात होता? काहीच दिसत नव्हते कारण मधे धबधबा धबाधबा पडत होता… एवढ्यात पलीकडून ओक वाणी ऐकायला आली 'थांबा रे मी येतोय', क्षणाचा हि विलंब न लावता स्वप्नील येताना दिसला…. पाठीवरचे ओझे काढून ठेवले होते आणि हातात दोर होता, दोर त्याने व्यवस्थित रित्या दगडात अडकवला आणि मला बोलला 'तू हो पुढे दोराला धरून, बाकीचं मी बघतो'....  हुकुमाप्रमाणे मी त्या दोराला धरून पाऊल टाकले, अनवाणी पायही त्या दगडावरून घसरत होते आणि मी पहिल्या पाऊलामधेच गडबडलो….  डाव्या पायाच्या ऐवजी उजवा पुढे टाकला. मागून जोरात ओरडण्याचा आवाज आला 'अबे #@$@, उजवा नाही डावा पुढे टाक, चल ये परत मागे' आणि मी डावा पाय पुढे टाकला… वरून पाणी एवढ्या जोरात कोसळत नव्हते पण त्याचा जोर जबरदस्त होता, त्यामुळे क्षणाक्षणाला तोंड आणि डोळे पुसावे लागायचे. पाऊल पुढे नक्की कुठे ठेवायचं हेच समजत नव्हत कारण काहीच तर दिसत नव्हत, माझी अवस्था फार खराब झाली होती, तरीही दगडाच्याच बाजूला कुठे तरी पायाने चाचपडत….  पाऊल ठेवायला जागा शोधत मी पुढे होऊ लागलो. दोर फार परिणामकारक ठरला आणि मी तो अवघड टप्पा पार केला, मागे वळून बघितले तर स्वप्नील आणि आबा दोघेही लगोलग आले.













0 comments :

Contact Details

wadekar.kunal@gmail.com