कापरा..... थरार पाथरा चा !!

वर्ष २००४- महिना जुलैचा, धो धो पावसात स्वप्नील आणि मी आम्ही दोघे रायलिंग पठारावर बसून (अर्थात चिंब भिजून) सुके आवळे चाखत होतो… समोर स्वच्छ सफेद रंगाचा ढगांचा पडदा तयार झाला होता. जणू त्या पडद्यात आम्ही आमचा सगळा मागील काळ चित्रफित करत होतो, अचानक वाऱ्याचा जोर खूप वाढला आणि समोरचा सफेद पडदा हलू लागला, ढग पळायला लागले आणि समोर हिरवागार लिंगाणा पाचूसारखा लखलखू लागला.
लिंगाणा बघून स्वप्नीलच्या तोंडून पटकन शब्द बाहेर पडले 'वाह असा दिमाख आणि अशी भयंकर चढाई सह्याद्री मध्ये कुठेहि नाही' आणि ते शब्द झेलत मीही चटकन बोलून गेलो 'आहे', दोन क्षण स्वप्नील माझ्याकडे बघतच राहिला...... पण माझी नजर सरळ लिंगाणा आणि पलीकडे रायगडावर खिळली होती. त्याने मला झोपेतून जाग कराव तसं जागवलं आणि विचारलं 'कुठे ???'… स्थिरावलेल्या नजरेने मी म्हणालो "पाथरा" !!!

पाथरा घाटाचा एक अवघड कातळटप्पा पार केल्यावर काढलेले एक छायाचित्रण
पाथरा ?? आणि तो कुठे आहे…स्वप्निल आश्चर्यभाव चेहऱ्यावर आणीत बोलला. मी म्हटले 'आजोबाच्या खांद्यावरून दक्षिणेला एक सरळसोट धार खाली उतरते, अतिशय अवघड-अनवट वाट. घाटाच्या वरून नुसते पाहिले तरी डोके चकरवते, कोणाचाही वावर नसलेली आणि अतिशय बिकट असलेली हि वाट सहसा कोणी करत नाही, पायथ्याला दोन गावं कुंदाची वाडी आणि बिथडवाडी पण ह्या दोनही वाडीतून पाथरा गाठणे म्हणजे अतिशय हाल सोसून वाट काढावी लागते. गावातले लोक विचारतील "कुठून चाललेत पावनं?" त्याचं उत्तर पाथरा दिलं कि त्यांचे हावभाव सगळं समीकरण समोर मांडतात'. असा आहे पाथरा.

देशावरून कोकण पहायची मज्जा काही औरच असते !!


स्वप्नील सगळं ऐकत होता समजत होता आणि काही वेगळी गणिते मांडत त्याने एक काठी उचलली, ओल्या लाल मातीत त्याने माळशेज पासून रतनगडापर्यंतचा एक विचित्र पण तरीही समजून येईल असा नकाशा आखला. आता स्वप्नील बोलत होता आणि मी बघत व ऐकत होतो, त्याने सुरवात पाथरा पासून केली 'बघ आजोबाच्या दक्षिणेकडून पाथरा चढू गुहिरी ने खाली उतरू गुहिरीवरून रतनला जायला कोणता मार्ग आहे का ?' मी म्हटले आहे कात्राची खिंड आणि रतनच्या मधून चिमणी क्लाइम्ब मारून आपण जाऊ शकतो, त्यावर तो खुश झाला 'व्वाह ! फारच छान, मग कात्राचा माथा गाठू. पण तिकडून खाली उतरायला?' मी बोललो कळंबधारचा मार्ग आहे पण खूप कठीण आहे, दोर लागेल.

घेऊ कि दोर माझे ६ मित्र, आम्ही सगळे १५० ते २०० फुटी दोर घेऊनच येऊ मग आपल्याला काहीही करता येईल, नाही जमला कळंबधारेचा मार्ग तर कात्रा उतरू त्यात काय.

कातर कडा, कात्रा
त्यात काय? हे बोलायला जेवढं सोपं वाटत होतं तेवढंच ते साकार करण कठीण होतं, कात्रा म्हणजे रतनच्या दक्षिणेला असलेला एक उंचच उंच डोंगर ज्याची उभी धार वारा आणि पाणी दोहोंनाही स्थिरावून देत नाही. घटोत्कच मांडी घालून बसावा असा कातर कडा म्हणजे कात्रा आणि  म्हणतो त्यात काय. पुढील वर्षात म्हणजेच २०११ मध्ये आम्ही हे दिव्य खरोखरच अनुभवले आणि तो चित्तथरारक अनुभव सांगताना पण रोमांच उभे राहतात, असो.

पिलान तर सगळा बनला होता पण आधी पाथराची पाहणी करायची होती, स्वप्नीलला बोललो पहिले जाऊन पहावा लागेल. तो बोलला उद्या आपण निघतोय पाथरासाठी… आणि एवढं बोलून आम्ही रायलिंगला रामराम ठोकला, त्याच्या जीपमध्ये माझ्या डोक्यात एकच विचार चालू होता…. पाथरा ह्या वेळेस करणे म्हणजे सह्याद्रीला एक प्रकारे दिलेलं आव्हान होतं.... त्यात गावाचं कोणी बरोबर येणं पण शक्य नव्हत कारण शेती करायची असल्यामुळे कुणी बाहेर पडत नाही. मला अशा वेळी एकच चेहरा समोर आला महादू आजोबा… एक जबरदस्त चपळ, कडवा आणि बिकट वाट अंधारातही अचूक काढणारा आमचा महादू आजोबा. बस्स त्यालाच बरोबर घ्यायचं ठरवलं.
पुण्याला स्वप्नीलच्या घरी आलो, लगोलग सगळं सामान घेतलं… त्याने बरोबर १५ फुटी दोर घेतला आणि बोलला 'अडी अडचणीत कामाला येईल'.
मी त्याला फक्त एवढंच बोललो 'पाऊस फार आहे आपण सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये गेलेलं चांगलं, आता आपल्याला काही फारसं दिसणारही नाही' त्यावर त्याने प्रतिउत्तर देत सांगितल 'नजारा कोणाला बघायचा आहे, आपण वाट शोधणार आणि लक्षात ठेवणार आहोत…चल माझी तयारी झाली'.

जुलैचा पाऊस म्हणजे अंगावर बाणांचा मारा आणि आम्ही सह्याद्रीमधली एक अतिबिकट वाट शोधायला जाणार होतो, सायंकाळी सुमारे ४.३० वाजता आम्ही जुन्नर गाठले…पावसाचा मारा कमी होता, माळशेजमध्ये गाडी वळली आणि देशावरून कोकणात पाऊल ठेवतो न ठेवतो तोच पावसाने आपले विक्राळ रूप दाखवले. टोकावडे सरळगाव शेणवा डोळखांब आणी गुंडे असा प्रवास होता, रात्रीचे ८.३० झाले आणि आम्ही गुंड्यात प्रवेश केला. पूर्ण गाव शांत निद्रिस्थ होतं, गाडी घराकडे वळवली आणि महादू आजोबांच घर गाठलं…. तेही विष्णूरूप घेऊन पहुडले होते पण आम्हाला बघून हूरहुरले आणि उठून खाटेवर बसले. ' ह्या वखताला इथ कुणीकडं आलातास' मी म्हटले 'आबा पाथरा गाठायचा विचार आहे'.


काय म्हणलास, पाथरा… डोकं ठिकाणावर हाय कि गहाण ठेवलयास. ह्या पावसात पाथरा माझ्या बा नं बी केला न्हाय आणि तुमी चाल्लाय व्हय पाथरा ला, जमायचं न्हाय पोरा.
आबा सकाळी निघायचं आहे, आणि तुमच्या शिवाय शक्य नाही. कसबस करून त्यांना तयार केलं, ते झालेही तयार पण एकाच अटीवर ती म्हणजे "वाट काशिबी असलं, पन माघार घेऊ नही"



आम्ही तिकडेच निद्रासन घेतले आणि पहाटेच्या ५ ला त्यांनी आम्हाला जाग केलं, कमरेला धोतर डोक्यावर घोंगडी, हातात बोरीची टणक काठी आणि धोतराला खोचलेला कोयता…जणू भैरोबा उभा आहे असा आभास झाला. ५.३० ला आम्ही गुंडे सोडले आणि जंगलवाट धरली जेणेकरून आमच्यावर पावसाचा मारा कमीत कमी व्हावा. आम्ही आज्या पर्वत गाठला आणि त्याची ३ टेकाडे चढून धारेवरून दक्षिणेला चालत होतो, वाट अतिबिकट तर होतीच पण झाडांच्या वेली आणि फांद्या आमची वाट अडवीत होत्या. कारवी फार माजली होती वरून वरुणदेव आमच्यावर बाणांचा मारा करत होते आणि महादू आजोबा त्यालाही हुलकावणी देत जंगलातून वाट काढत होते, एका धारेवरून दुसर्या धारेवर असं आमच चालूच होतं. वाट अशी असावी असा आम्ही दोघांनी अंदाज बांधलाच होता मध्ये दोन धबधबे लागले त्यांना व्यवस्थित पार करत आम्ही पाथराच्या ऐन खिंडीत पाय टेकला. तिकडे एक उभा २५-३० फुटी पाषाण झाडाला टेकून होता, त्याला बघून असं वाटत होतं कि जणू त्या झाडाचा त्याने आधार घेतला असावा आणि पुढे गेलो न गेलो तोच पाण्याचं एक टाक लागलं, बाजूला घाटन्देवीचं मंदिर वजा गडद होती. आम्ही तिकडे थोडा वेळ स्थिरावलो, पुढंच काहीही दिसत नव्हत आणि मागे बघितले कि कसे आलो तेही समजत नव्हत.

घाटनदेवी, फोटो © स्वप्नील ओंक
स्वप्नील कानात पुटपुटला 'तू काळजी करू नकोस मी प्रत्येक ठिकाणी खुणा करून ठेवल्या आहेत'

खिंडीत पाऊल टाकले आणि जणू घाटन्देवीने वरुणदेवांना आदेश दिला असावा कि पाऊस आता पुरे… पाऊस थांबला, ढगांचा पडलेला अजगर विळखा सुटू लागला आणि ते सर्व ढग वाऱ्याचा मार खात देशावर पळून जाताना दिसले… समोरचा परिसर स्वच्छ दिसू लागला, कुमशेताच्या कोंबड्या पासून पार भीमाशंकर पर्यंत सर्व परिसर अगदी नव्हे पण स्पष्ट अस्पष्ट दिसत होता. आंम्ही तिकडे बराच वेळ थांबलो, कोंबडा-न्हाप्ता त्याच्या खाली घोडीशेप-हरीशचा बालेकिल्ला-रोहिदास-देवदांड्या-भोजगिरि-घुण्या-भैरवगड-वानरलिंगी-ढाकोबा-भीमाशंकर असा अफाट परिसर डोळ्यासमोरून आजही जात नाही. त्याचंबरोबर समोर वर पाहिले कि डोके चक्रावून टाकणारा चढ दिसत होता पाथराचा, खरी कसब तर आता लागणार होती आमची, आमच्या धैर्याची आणि आमच्यातल्या गिर्यारोहकाची………



ओकांचं कार्ट माळशेजचे सर्व कडे आणि त्याचं वर्णन आबांना सांगण्यात गुंग होतं आणि मी पुढची ९०' अंश कोनाची ती कापरं भरवणारी चढाई बघण्यात. खरंच त्यावेळी मनात एक विचार आला कि हि घाटवाट काढणाऱ्याला दंडवत ठोकलं पाहिजे.
खिंड गाठेपर्यंत आमची चांगलीच पायपीट झाली होती, स्वप्नीलने इथेच घोषणा केली कि पावसाळ्याचा अंदाज घेत हा घाट पावसाळ्यात सह्याद्री मधला सर्वात कठीण आणि कपटी घाट असावा… त्याच्या तोंडचं वाक्य 'हा घाट नाही घात आहे' त्यावर आबा म्हणाले 'अरे हि तर सुरवात आहे'.
चढाईच्या पूर्वी एक छोटं झाड लागतं तिकडे आम्ही आमच्याकडची सफरचंद फस्त केली आणि पुढे चालू लागलो, आता वाट 'दगडांच्या देशाची' होती जे पावसामुळे ओले चिंब झाले होते. इथून पुढे ओकांनी नेतृत्व सांभाळलं… ओक 'क्लाईम्बर' मध्ये NIM मधून ५ सुवर्ण पदक मिळवणारे गिर्यारोहक होते आणि आमचा भरोसा त्यांच्यावर जास्त होता आणि आजही आहे, त्याने क्षणात आणि अगदी सहजपणे चढाई सुरु केली. दोन तीन छोटे कातळटप्पे पार केले आणि एका अवघड कातळटप्प्याला येउन भिडलो…. कडा १० फुटी किव्वा जास्तीत जास्त १५ फुटी असावा पण ओल्या दगडावर आमचे पाय टिकत नव्हते, स्वप्नील वर चढून आम्हाला मार्गदर्शन करत होता.... मी पायातले फ्लोटर्स काढून त्याच्या जवळ दिले.
अतिशय सावध, शांत आणि धैर्याने तो टप्पा पार झाला, पुढचा मार्गहि आम्ही असाच गाठला आणि घाट संपायची लक्षणं दिसू लागली…खूप बरं वाटत होतं आणि आनंदही, कि आपण एवढा कठीण घाट चढलो पण तो आनंद जास्त वेळ तग धरू शकला नाही. कारण शेवटच्या टप्प्यात एका दगडाला वळसा घालून जिकडे मार्ग जात होता.... तिकडे मध्ये एक मोठा धबधबा वाहत होता आणि तिथला दगड त्या पाण्याच्या प्रवाहामुळे उतरंडीला खोल खोल जाताना दिसत होता. पलीकडच काहीच दिसत नव्हत, स्वप्नीलने अतिशय धाडसाने आणि सर्व कौशल्य पणाला लावून तो धबधबा पार केला..... पण प्रश्न आमचा होता.त्याने पलीकडे जाऊन आम्हाला हाक देत खालील शब्द उद्गारले जे आजही कानात घुमतात, ज्या ज्या वेळी मी पाथरा घाट चढतो…. ते शब्द होते...
"तिकडेच थांबा, एक पाऊलहि पुढे येऊ नका…. दगड घसरा आहे आणि तोल गेला तर खेळ कायमचा संपला"

तो काय करत होता? कुठे जात होता? काहीच दिसत नव्हते कारण मधे धबधबा धबाधबा पडत होता… एवढ्यात पलीकडून ओक वाणी ऐकायला आली 'थांबा रे मी येतोय', क्षणाचा हि विलंब न लावता स्वप्नील येताना दिसला…. पाठीवरचे ओझे काढून ठेवले होते आणि हातात दोर होता, दोर त्याने व्यवस्थित रित्या दगडात अडकवला आणि मला बोलला 'तू हो पुढे दोराला धरून, बाकीचं मी बघतो'....  हुकुमाप्रमाणे मी त्या दोराला धरून पाऊल टाकले, अनवाणी पायही त्या दगडावरून घसरत होते आणि मी पहिल्या पाऊलामधेच गडबडलो….  डाव्या पायाच्या ऐवजी उजवा पुढे टाकला. मागून जोरात ओरडण्याचा आवाज आला 'अबे #@$@, उजवा नाही डावा पुढे टाक, चल ये परत मागे' आणि मी डावा पाय पुढे टाकला… वरून पाणी एवढ्या जोरात कोसळत नव्हते पण त्याचा जोर जबरदस्त होता, त्यामुळे क्षणाक्षणाला तोंड आणि डोळे पुसावे लागायचे. पाऊल पुढे नक्की कुठे ठेवायचं हेच समजत नव्हत कारण काहीच तर दिसत नव्हत, माझी अवस्था फार खराब झाली होती, तरीही दगडाच्याच बाजूला कुठे तरी पायाने चाचपडत….  पाऊल ठेवायला जागा शोधत मी पुढे होऊ लागलो. दोर फार परिणामकारक ठरला आणि मी तो अवघड टप्पा पार केला, मागे वळून बघितले तर स्वप्नील आणि आबा दोघेही लगोलग आले.













काळ(घाट) रात्र मंतरलेली….


अलंग मदन आणि कुलंग ह्या त्रिकुटामध्ये काही अजबच जग वसलेलं आहे…ते जग खूप गूढ आणि अपिरिचित असं आहे. साधारणतः गिर्यारोहक (सर्वच) हे त्रिदेव किल्ले आंबेवाडी किंबहुना उडदावने ह्या पायथ्याशी वसलेल्या गावातून सोयीस्कर रित्या सर करतात. दोराशिवाय हे त्रिदेव सर करणे म्हणजे दिव्यचं….
असो….पण ह्या त्रिकुटाला कोकणातून कोणत्या घाटवाटा जुळतात माहित आहे ???
१) चोंढा घाट - अतिशय सोप्पा आणि सोयीस्कर घाट, चढायला जास्तीत जास्त आरामकरून पण घाटघर गाठायला २ तास पुरेसे आहेत.
२) उंबऱ्या घाट - बिकट वाट, छाताडावरची चढण आणि सहसा वापरात नसलेली वाट, ह्या वाटेने आम्ही परत खाली कोकणात आलो.
३) करोली घाट - अत्यंत सुंदर निसर्ग दर्शवणारी वाट, सह्याद्रीची खरी ओळख करून देणारी वाट पण तेवढाच दम काढणारी.
ह्या झाल्या सर्वांना बऱ्यापैकी परिचित असलेल्या घाटवाटा…
परंतु अजून ३ वाटा अशा आहेत की त्या बद्दल मी तरी खूप कमीच ऐकल आहे….इतर कोणी ऐकलं असेल तर माहित नाही.
अशीच एक अनवट वाट मी निवडली….  काळ घाट !!!

काळ घाट आता वापरात नाही… बऱ्याच वर्षा पूर्वी म्हणजे साधारण २००१-२००२ मध्ये मी आणि महादू आजोबा (गुंड्याचे रहिवासी) आम्ही करोली घाट करून अलंग मदन कुलंग सर केला होता. त्या वेळी त्यांनी हा घाट मला दाखवला होता.... सांगताना त्यांनी हेही सांगितले होते कि कुलंगला जायला हा घाट सोयीस्कर आहे कारण तो कुलंगच्या पायथ्याशी निघतो आणि तिकडून कुलंगला एक नाळ जाते, जी फार बिकट आणि कठीण वाट आहे. त्यांनी मला त्या नाळी पर्यंतचा मार्ग दाखवला आणि नंतर कसे जायचे ते समजावून सांगितले पण आता मला फारसं काही नीट आठवत नाही.
आज महादू आजोबा नाहीत. असते तर फार बऱ झालं असतं. साल २०१४ ची सुरवात मी ह्या घाटाने करणार असं मनात ठरवून निघालो आणि मार्गस्थ झालो, डोळखांब गाठले तिकडून ह्या घाटाला एकही वाहन जात नाही आणि पर्यायही नाही. त्यामुळे डोळखांबचा माझा भाऊ मिलिंदशी संपर्क साधला, आसपासच्या ४०-५० गावांशी त्याचा व्यवस्थित संपर्क असतो म्हणून त्यालाही बरोबर घेतलं. आम्ही काळ घाटासाठी मार्गस्थ झालो...... त्याच्या दुचाकी वर.
पायथ्याचे गाव गाठले तेव्हा रात्रीचे ११ वाजले होते…. गावात पोहोचल्यावर एक गोष्ट मात्र मला समजून चुकली होती कि हा घाट एवढा अपरिचित का ??  कारण इथे पोहोचणे.... आणि तेही वाहन नसता !!! म्हणजेच एक मोठं कौशल्य कारण रात्रीच्या त्या अंधारात आमची दुचाकी त्या रस्तावजा खड्यात दणकली कि नको तिथे वेदना होत होत्या आणि त्या सहन करून घाट करणे म्हणजे सह्याद्रीला एका प्रकारे आव्हान ठरणार होते.
गावात आम्ही एवढ्या रात्री पोहोचलो… गावं कसले वाडीच होती ती !!! पण एवढ्या रात्री कोण आलं….  म्हणून आमची विचारपूस करायला २-३ टाळकी बाहेर आली, बाकी गावं शांत सह्याद्रीच्या कुशीत घोंगडं टाकून निजलं होत. ती २-३ टाळकी आमच्या पर्यंत पोहोचली अंधार असल्यामुळे फारसं व्यवस्थित दिसत नव्हत….  त्यांच्या हातात रॉकेलचा दिवा होता, आमच्याकडे विजेरी(टॉर्च).
त्यातली एक व्यक्ती माझ्या भावाला म्हणजे मिलिंदला उद्देशून बोलली "काका, तुम्ही ? आणि एवढ्या रात्री" (मिलिंद भिक्षुकी करतो त्यामुळे तिथले गावकरी त्याला 'काका' म्हणतात.) त्यांच्या ह्या प्रश्नांवर मिलिंद म्हणाला  "हा माझा मोठा भाऊ, ह्याला काळ घाट करायचा आहे"
"काळ घाट? अन त्यो कुठेशी हाय ?". मला हे माहित होतं कि असंच उत्तर येणार….  मी मिलिंदला थांबवलं आणि स्वतः बोलायला सुरवात केली. आमच्यात बरीच चर्चा झाली…. होय…  नाय…. व्हय परं… न्हाय परं त्यो घाट आता कोणी करीत बी न्हाय, काका त्यो काळ घाट हाय आणि तुमी रात्रीचे निघाला, तुमी त्यापेक्सा चोंढ्याने बी पोचाल कि... त्यो बी सोपा हाय अन वाट बी.
मी म्हटलं मला ह्याच घाटाने जायचे आहे कोणी ह्या घाटाने कधी गेले आहे का? उत्तर न्हाय म्हणून आलं आणि मला जे समजायचं ते मी समजलो आणि आम्ही मार्गस्थ झालो.
काळ घाट!!! नावाप्रमाणे आपला रौद्रपणा दाखवतो… आम्ही वाडीतून सुरवात केली आणि एक छोटी टेकडी पार केल्यावर दूरवर एक दिवा टीमटीमताना दिसला…. मी मिलिंदकडे पाहिले…. त्याने माझ्याकडे आणि आम्ही दिव्याच्या दिशेने चालू लागलो. तो दिवा एका छोट्याश्या झोपडीमध्ये टीमटीमत होता, आतली मंडळी जागी होती… एक वयस्कर म्हातारा, दोन छोटी गोंडस पोरं आणि त्यांची आई, हे सगळे धान्य गोळा करत आणि निवडत बसले होते.
त्यांना आमची चाहूल लागली आणि म्हातारा बाहेर आला, आम्ही आमची ओळख करून दिली…. तो मिलिंदला मात्र ओळखत होता. त्याला आम्ही काळ घाटाची माहिती विचारली तर तो आमच्याकडे एकटक बघत बसला आणि बोलला विचार सोडून द्या, मी बोललो त्या साठी आम्ही इथे नाही आलो…. मी त्याला विचारले तुम्ही केलाय का कधी काळ घाट? त्यांनी होकारार्थी मान हलवली पण तो पुढे बोलला "म्या माझ्या आज्या बरुबर गेल्तो, फार मेहनत घ्यावी लागल तुला पोरा" मी म्हटलं वाट सांगा आणि त्यांनी वाट सांगायला सुरवात केली…. ३ छोटी टेपाड पार करत डोंगराची एक धार लागते त्या बाजूने चालत जाऊन एका धारेला वळसा मारून एक दगड चढून मग जंगल वाट येते आणि मग पुन्हा दगडाची वाट थेट कुलंगच्या पायथ्याला जाऊन मिळते.
मार्ग समजला होता पण तो गाठायचा होता… ३ छोट्या टेकड्या पार झाल्या तेव्हा पहाटेचे २ वाजले होते, मजल दर करत आम्ही चढण चढत होतो. चढण उभी छाताडावरची… चारही बाजूला काळोख होता… दूरवर एक दोन दिवे चमकताना दिसायचे पण अंधार फार असल्यामुळे आम्ही फक्त मार्गस्थ व्हायचे ठरवले होते. वाट कुठेच दिसत नव्हती फक्त आणि फक्त डोंगर दरी आणि कारवी ह्यांचा सहवास, पाऊलवाट कुठेच सापडत नव्हती… कशी सापडणार !!!
डोंगराच्या धारेने वर चढत चढत एक दरी समोर आ वासून होती तिकडे म्हाताऱ्याचे शब्द आठवले 'कि दगडाला एका ठिकाणी वळसा आहे' मिलिंदला बोललो बघ कुठे जागा दिसते का !! त्याने नकारार्थी मान हलवली मग अजून थोडी उंची गाठली आणि वळसा सापडला…. बस्स्स् आता आपण मार्गस्थ लागलो असा काहीतरी विचार मनाला शिवून गेला आणि तो अचूक होता कारण पुढची वाट गुरांची नित्य नियमाची वाट, जनावर इथे येणार म्हणजे ते परत आपल्या गावालाच गाठणार हे नक्की होत आणि आम्ही तीच वाट निवडली…. मधले ४-५ कातळ टप्पे सोडले तर वाट व्यवस्थित जात होती आणि आता तांबडं फुटू लागलं होतं !!!
काळ घाटातून आजोबाचे लोभस चित्र आजही डोळ्यासमोरून जात नाही !!!

आता पहाटेचे ५ वाजत आले होते बऱ्यापैकी उजेड झाला होता, मी काळ घाटातून मागे वळून पाहिले… गावांना जाग येत होती कारण चुलीचा धूर आसमंत गाठायला व्याकूळ होत होता, पहाटेचे सप्तसूर (पक्षांचा किलबिलाट, माकडाचे हुप्प्प्प्प्प, हवे मुळे होणारा झाडांचा सूळसुळाट, किर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र आवाज करणारा तो रातकिडा आणि मधेच आमच्या पायाखाली येणाऱ्या चाऱ्याचा चर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र असा आवाज) हे सगळे फार हूरहुरी आणत होते शरीरात, पण आम्ही चालत होतो. जंगल रस्ता फारंच किर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र झाडीचा पण भयावह आभास देत होता.
जंगलवाट संपली आणि समोर अंधुक अंधुक प्रकाशात अतिशय सुंदर, महाकाय आणि प्रचंड कुलंग किल्ला आम्हाला सामोरा आला आणि १० वर्षापूर्वीची एक इच्छा मी पूर्ण केली होती… याची देही याची डोळा मी कुलंग पायथ्या पासून पाहिला याचा प्रचंड आनंद होता मनात.…तेव्हा पहाटेचे ५.३० झाले होते, अजूनही आसमंत तांबडा होता.

आणि कोकण दरवाज्याने सुटकेचा श्वास घेतला…….

आणि कोकण दरवाज्याने सुटकेचा श्वास घेतला…….
रतनगडावरची पहाट

रतनगड… सह्याद्री मधलं रत्नचं !!! रत्न कारण हिरा जसा कोंदणात बसवतात तसाच रतनगड कोंदणात बसवलेला सह्याद्रीचा हिराचं आहे…. चारही बाजूंनी सह्याद्रीचे जे सौंदर्य दिसते त्याला शब्दही कमी पडतात स्पष्टीकरण द्यायला.
रतनगडावरून कात्राबाई करंडा घाट गुहीरीचे दार आणि आजोबा पर्वत

रतनगड चारही बाजूंनी वेगवेगळ्या किल्ल्यांनी आणि सह्याद्रीच्या रौद्र कड्यांनी व्यापलेला आहे, रतनवाडी हे पायथ्याला असलेले एक गावं, ह्या गावामध्ये 'अमृतेश्वर मंदिर' आहे अतिशय सुंदर आणि खास भेट द्यावी असे हे मंदिर. मंदिराचे बांधकाम अतिशय सुंदर आणि विलोभनीय आहे, विलोभनीय एवढे कि छायाचित्रकारांची तुंबळ उडते छायाचित्रण करायला आणि कितीही चित्रीकरण केले तरी मन मात्र भरत नाही…. एकदा तरी भेट देऊन बघाच !!!!
रतनगडावर ३ दरवाजे आहेत, त्यातला पहिला म्हणजे गणेश दरवाजा जो रतनवाडीवरून गडावर गेले कि समोर दिसतो, दुसरा त्रंबक दरवाजा ह्या दरवाज्या बद्दल बऱ्याच जणांना गैरसमज आहे कि हा कल्याण दरवाजाच आहे पण हा त्रंबक दरवाजा आहे जो अलंग मदन कुलंग ह्या त्रिकुटाच्या अगदी समोर आहे साम्रड नावाचे एक गाव आहे तिथून एक वाट ह्या दरवाज्याला येउन मिळते तसेच दुसरी एक वाट ह्या दरवाज्याला येउन मिळते ती म्हणजे साकुर्ली गावातून 'बाण' नावाचा कडा आहे त्याच्या अगदी पोटातून म्हणजेच नळीतून एक वाट ह्या दरवाज्याला येउन मिळते पण हि वाट फारच बिकट आणि कठीण आहे, ज्याला सह्याद्रीची माहिती नाही त्याने सह्याद्रीच्या वाट्याला जाऊ नये ह्याचा प्रत्यय ह्या वाटेवर अगदी प्रत्येक क्षणाला येतो. आयुष्यात एकदाच ह्या वाटेने गेलो आणि ठरवलं परत ह्या वाटेत हात टाकायचा नाही.
कोकण दरवाज्यातून कात्राचे अजस्त्र कडे छायाचित्रीत करताना मी स्वतः  !!!
 आणि आता राहिला तिसरा आणि शेवटचा दरवाजा तो म्हणजे कोकण दरवाजा उर्फ कल्याण दरवाजा, ह्या दरवाज्याला येणाऱ्या पायऱ्या नामशेष झाल्या आहेत. कशा झाल्या आणि कोणी केल्या हे विचारू नका, उत्तर मलाही माहित नाही. कोकण दरवाज्याला येण्या साठी दोन वाटा आहेत दोनही अतिशय बिकट आणि कठीण आहेत कारण चढायला किव्वा उतरायला म्हणा पायऱ्या नाहीत, प्रस्तरारोहणाशिवाय पर्याय नाही.

प्रस्तरारोहण(rappelling) करताना अनिकेत आणि मदतीचा हात(Belay) देणारे विशाल आणि विक्रम
येणाऱ्या दोन वाटा ह्या वेगवेगळ्या गावातून वर येतात पहिले गाव म्हणजे साम्रड, साम्रड गावातून जी वाट त्रंबक दरवाज्याला मिळते त्याचं वाटेने पुढे येउन त्रंबक दरवाजा न चढता कड्याला वळसा घालून सरळ पायवाटेने कोकण दरवाज्यापाशी पोहोचता येते, ह्या वाटेने संपूर्ण रतनगड अतिशय सुंदर दिसतो. आणि दुसरे गाव व्हरपडी किव्वा डेहेणे, ह्या गावातून एक वाट कात्राबाई ह्या कड्याच्या अगदी शेजारून वर येते परंतु हि वाट अतिशय फसवी आणि अवघड आहे. माहिती असेल तरच ह्या वाटेने जावे असा माझा वैयक्तिक सल्ला सर्वांना आहे, बरेच जण ह्या वाटेला 'बारा पायरीची वाट' असे संबोधतात परंतु हि वाट अतिशय जुनी कोकण दरवाज्याची वाट आहे. बारा पायरीची वाट हि आजोबा पर्वताला जाणाऱ्या वाटेला म्हणतात, हे स्पष्टीकरण मला व्हरपडी, डेहेणे, खोबऱ्याची वाडी आणि गुंडे येथील स्थानिक्कानी दिल.
कृणाल आलेल्या वाटेकडे कटाक्ष टाकताना…
डावीकडे रतनगड आणि तिकडून व्हरपडी गावाला येणारी वाट !!!

 आम्ही नुकतीच केलेली हि वाट आता गिर्यारोहकांसाठी मोकळी झालेली आहे, त्यामुळे आता तरी कोकण दरवाजा गुदमरून गेलेल्या श्वासातून मुक्त होईल आणि स्वतंत्र श्वास घेईल कारण आता त्याच्या पण अंगाखांद्यावर गिर्यारोहक खेळतील आणि मनसोक्त आनंद घेतील…
व्हरपडी गावातून दिसणारे विहंगम दृश्य !!!
डावीकडून रतनगड, कात्राबाई, करंडा घाट, गुहीरीचे दार आणि आजोबा पर्वत


Contact Details

wadekar.kunal@gmail.com