अलंग मदन आणि कुलंग ह्या त्रिकुटामध्ये काही अजबच जग वसलेलं आहे…ते जग खूप गूढ आणि अपिरिचित असं आहे. साधारणतः गिर्यारोहक (सर्वच) हे त्रिदेव किल्ले आंबेवाडी किंबहुना उडदावने ह्या पायथ्याशी वसलेल्या गावातून सोयीस्कर रित्या सर करतात. दोराशिवाय हे त्रिदेव सर करणे म्हणजे दिव्यचं….
असो….पण ह्या त्रिकुटाला कोकणातून कोणत्या घाटवाटा जुळतात माहित आहे ???
१) चोंढा घाट - अतिशय सोप्पा आणि सोयीस्कर घाट, चढायला जास्तीत जास्त आरामकरून पण घाटघर गाठायला २ तास पुरेसे आहेत.
२) उंबऱ्या घाट - बिकट वाट, छाताडावरची चढण आणि सहसा वापरात नसलेली वाट, ह्या वाटेने आम्ही परत खाली कोकणात आलो.
३) करोली घाट - अत्यंत सुंदर निसर्ग दर्शवणारी वाट, सह्याद्रीची खरी ओळख करून देणारी वाट पण तेवढाच दम काढणारी.
ह्या झाल्या सर्वांना बऱ्यापैकी परिचित असलेल्या घाटवाटा…
परंतु अजून ३ वाटा अशा आहेत की त्या बद्दल मी तरी खूप कमीच ऐकल आहे….इतर कोणी ऐकलं असेल तर माहित नाही.
अशीच एक अनवट वाट मी निवडली…. काळ घाट !!!
काळ घाट आता वापरात नाही… बऱ्याच वर्षा पूर्वी म्हणजे साधारण २००१-२००२ मध्ये मी आणि महादू आजोबा (गुंड्याचे रहिवासी) आम्ही करोली घाट करून अलंग मदन कुलंग सर केला होता. त्या वेळी त्यांनी हा घाट मला दाखवला होता.... सांगताना त्यांनी हेही सांगितले होते कि कुलंगला जायला हा घाट सोयीस्कर आहे कारण तो कुलंगच्या पायथ्याशी निघतो आणि तिकडून कुलंगला एक नाळ जाते, जी फार बिकट आणि कठीण वाट आहे. त्यांनी मला त्या नाळी पर्यंतचा मार्ग दाखवला आणि नंतर कसे जायचे ते समजावून सांगितले पण आता मला फारसं काही नीट आठवत नाही.
आज महादू आजोबा नाहीत. असते तर फार बऱ झालं असतं. साल २०१४ ची सुरवात मी ह्या घाटाने करणार असं मनात ठरवून निघालो आणि मार्गस्थ झालो, डोळखांब गाठले तिकडून ह्या घाटाला एकही वाहन जात नाही आणि पर्यायही नाही. त्यामुळे डोळखांबचा माझा भाऊ मिलिंदशी संपर्क साधला, आसपासच्या ४०-५० गावांशी त्याचा व्यवस्थित संपर्क असतो म्हणून त्यालाही बरोबर घेतलं. आम्ही काळ घाटासाठी मार्गस्थ झालो...... त्याच्या दुचाकी वर.
पायथ्याचे गाव गाठले तेव्हा रात्रीचे ११ वाजले होते…. गावात पोहोचल्यावर एक गोष्ट मात्र मला समजून चुकली होती कि हा घाट एवढा अपरिचित का ?? कारण इथे पोहोचणे.... आणि तेही वाहन नसता !!! म्हणजेच एक मोठं कौशल्य कारण रात्रीच्या त्या अंधारात आमची दुचाकी त्या रस्तावजा खड्यात दणकली कि नको तिथे वेदना होत होत्या आणि त्या सहन करून घाट करणे म्हणजे सह्याद्रीला एका प्रकारे आव्हान ठरणार होते.
गावात आम्ही एवढ्या रात्री पोहोचलो… गावं कसले वाडीच होती ती !!! पण एवढ्या रात्री कोण आलं…. म्हणून आमची विचारपूस करायला २-३ टाळकी बाहेर आली, बाकी गावं शांत सह्याद्रीच्या कुशीत घोंगडं टाकून निजलं होत. ती २-३ टाळकी आमच्या पर्यंत पोहोचली अंधार असल्यामुळे फारसं व्यवस्थित दिसत नव्हत…. त्यांच्या हातात रॉकेलचा दिवा होता, आमच्याकडे विजेरी(टॉर्च).
त्यातली एक व्यक्ती माझ्या भावाला म्हणजे मिलिंदला उद्देशून बोलली "काका, तुम्ही ? आणि एवढ्या रात्री" (मिलिंद भिक्षुकी करतो त्यामुळे तिथले गावकरी त्याला 'काका' म्हणतात.) त्यांच्या ह्या प्रश्नांवर मिलिंद म्हणाला "हा माझा मोठा भाऊ, ह्याला काळ घाट करायचा आहे"
"काळ घाट? अन त्यो कुठेशी हाय ?". मला हे माहित होतं कि असंच उत्तर येणार…. मी मिलिंदला थांबवलं आणि स्वतः बोलायला सुरवात केली. आमच्यात बरीच चर्चा झाली…. होय… नाय…. व्हय परं… न्हाय परं त्यो घाट आता कोणी करीत बी न्हाय, काका त्यो काळ घाट हाय आणि तुमी रात्रीचे निघाला, तुमी त्यापेक्सा चोंढ्याने बी पोचाल कि... त्यो बी सोपा हाय अन वाट बी.
मी म्हटलं मला ह्याच घाटाने जायचे आहे कोणी ह्या घाटाने कधी गेले आहे का? उत्तर न्हाय म्हणून आलं आणि मला जे समजायचं ते मी समजलो आणि आम्ही मार्गस्थ झालो.
काळ घाट!!! नावाप्रमाणे आपला रौद्रपणा दाखवतो… आम्ही वाडीतून सुरवात केली आणि एक छोटी टेकडी पार केल्यावर दूरवर एक दिवा टीमटीमताना दिसला…. मी मिलिंदकडे पाहिले…. त्याने माझ्याकडे आणि आम्ही दिव्याच्या दिशेने चालू लागलो. तो दिवा एका छोट्याश्या झोपडीमध्ये टीमटीमत होता, आतली मंडळी जागी होती… एक वयस्कर म्हातारा, दोन छोटी गोंडस पोरं आणि त्यांची आई, हे सगळे धान्य गोळा करत आणि निवडत बसले होते.
त्यांना आमची चाहूल लागली आणि म्हातारा बाहेर आला, आम्ही आमची ओळख करून दिली…. तो मिलिंदला मात्र ओळखत होता. त्याला आम्ही काळ घाटाची माहिती विचारली तर तो आमच्याकडे एकटक बघत बसला आणि बोलला विचार सोडून द्या, मी बोललो त्या साठी आम्ही इथे नाही आलो…. मी त्याला विचारले तुम्ही केलाय का कधी काळ घाट? त्यांनी होकारार्थी मान हलवली पण तो पुढे बोलला "म्या माझ्या आज्या बरुबर गेल्तो, फार मेहनत घ्यावी लागल तुला पोरा" मी म्हटलं वाट सांगा आणि त्यांनी वाट सांगायला सुरवात केली…. ३ छोटी टेपाड पार करत डोंगराची एक धार लागते त्या बाजूने चालत जाऊन एका धारेला वळसा मारून एक दगड चढून मग जंगल वाट येते आणि मग पुन्हा दगडाची वाट थेट कुलंगच्या पायथ्याला जाऊन मिळते.
मार्ग समजला होता पण तो गाठायचा होता… ३ छोट्या टेकड्या पार झाल्या तेव्हा पहाटेचे २ वाजले होते, मजल दर करत आम्ही चढण चढत होतो. चढण उभी छाताडावरची… चारही बाजूला काळोख होता… दूरवर एक दोन दिवे चमकताना दिसायचे पण अंधार फार असल्यामुळे आम्ही फक्त मार्गस्थ व्हायचे ठरवले होते. वाट कुठेच दिसत नव्हती फक्त आणि फक्त डोंगर दरी आणि कारवी ह्यांचा सहवास, पाऊलवाट कुठेच सापडत नव्हती… कशी सापडणार !!!
डोंगराच्या धारेने वर चढत चढत एक दरी समोर आ वासून होती तिकडे म्हाताऱ्याचे शब्द आठवले 'कि दगडाला एका ठिकाणी वळसा आहे' मिलिंदला बोललो बघ कुठे जागा दिसते का !! त्याने नकारार्थी मान हलवली मग अजून थोडी उंची गाठली आणि वळसा सापडला…. बस्स्स् आता आपण मार्गस्थ लागलो असा काहीतरी विचार मनाला शिवून गेला आणि तो अचूक होता कारण पुढची वाट गुरांची नित्य नियमाची वाट, जनावर इथे येणार म्हणजे ते परत आपल्या गावालाच गाठणार हे नक्की होत आणि आम्ही तीच वाट निवडली…. मधले ४-५ कातळ टप्पे सोडले तर वाट व्यवस्थित जात होती आणि आता तांबडं फुटू लागलं होतं !!!
![]() |
| काळ घाटातून आजोबाचे लोभस चित्र आजही डोळ्यासमोरून जात नाही !!! |
आता पहाटेचे ५ वाजत आले होते बऱ्यापैकी उजेड झाला होता, मी काळ घाटातून मागे वळून पाहिले… गावांना जाग येत होती कारण चुलीचा धूर आसमंत गाठायला व्याकूळ होत होता, पहाटेचे सप्तसूर (पक्षांचा किलबिलाट, माकडाचे हुप्प्प्प्प्प, हवे मुळे होणारा झाडांचा सूळसुळाट, किर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र आवाज करणारा तो रातकिडा आणि मधेच आमच्या पायाखाली येणाऱ्या चाऱ्याचा चर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र असा आवाज) हे सगळे फार हूरहुरी आणत होते शरीरात, पण आम्ही चालत होतो. जंगल रस्ता फारंच किर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र झाडीचा पण भयावह आभास देत होता.
जंगलवाट संपली आणि समोर अंधुक अंधुक प्रकाशात अतिशय सुंदर, महाकाय आणि प्रचंड कुलंग किल्ला आम्हाला सामोरा आला आणि १० वर्षापूर्वीची एक इच्छा मी पूर्ण केली होती… याची देही याची डोळा मी कुलंग पायथ्या पासून पाहिला याचा प्रचंड आनंद होता मनात.…तेव्हा पहाटेचे ५.३० झाले होते, अजूनही आसमंत तांबडा होता.


This comment has been removed by the author.
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
DeleteSahich.. I agree with Jeetendra Bankapure.
ReplyDeletePan next time jatana agodar kalav mhanje mi pan yein..
nakkich
Deleteज...ब...री… एक नंबर…
ReplyDeleteइतक्या मध्यरात्री असले अनवट अपरिचित घाटवाटा करण्याचे धाडस … कसं काय बुवा?
जमल्यास आम्हाला सुद्धा घेऊन चल ह्या घाटवाटेने… पण दिवसाढवळ्या हं :)
nakkich Saheba,
DeleteJau aapan parat